केज ! प्रतिनिधी
केज येथील माउली विद्यापीठ संचलित सरस्वती महाविद्यालय, केज येथे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा विभागांच्या संयुक्त विद्यमाने, आयक्यूएसी उपक्रमांतर्गत मंगळवार रोजी अतिथी व्याख्यान संपन्न झाले. विद्यार्थ्यांना विविध साहित्यिक व भाषिक विषयांचे सखोल ज्ञान सर्जनशीलता, व्यक्तिमत्त्व विकास याविषयी माहिती देण्यात आली.
प्रमुख व्याख्याते बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज येथील प्रोफेसर डॉ. छत्रभुज सोळंके यांनी ‘नाट्यलेखन’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी नाट्यलेखनाची संकल्पना, नाटकाची रचना, कथानक, व्यक्तिरेखा, संवादलेखन तसेच नाट्यलेखनातील विविध घटक यांचे अभ्यासपूर्ण विवेचन केले.
इंग्रजी विभागाच्या वतीने बाबुरावजी आडसकर महाविद्यालय, केज येथील प्रोफेसर डॉ. रामेश्वर सोळुंके यांनी संवाद कौशल्ये, भाषा या विषयावर मार्गदर्शन केले. स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी गुणवत्ता निकष पूर्ण करण्याबरोबरच प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभावी संवादाचे महत्त्व, संवादकौशल्य विकसित करण्याच्या पद्धती तसेच शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनातील त्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
हिंदी विभागाच्या वतीने बाबुरावजी आडसकर महाविद्यालय, केज येथील प्रोफेसर डॉ. केदार आर. डी. यांनी ‘हिंदी साहित्य का इतिहास’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. हिंदी साहित्याच्या विविध कालखंडांचा आढावा घेत त्यांनी साहित्याच्या विकासाची वैशिष्ट्ये आणि विविध साहित्यिक प्रवाह यांचे विवेचन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. एम. धिमधिमे होते. विद्यार्थ्यांनी अशा ज्ञानवर्धक उपक्रमांचा लाभ घेऊन विषयज्ञानासोबतच संवादकौशल्य, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सारिका बुरगे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सीता केंद्रे यांनी केले, तर आभार डॉ. संतोष मस्के यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इंग्रजी विभागाचे प्रा डॉ. पठाण पी. वाय., इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ.वैशाली आहेर यांनी परिश्रम घेतले व्याख्यानास प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *