केजमध्ये शिक्षण विभागाला एसीबीचा दणका
जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; पंचायत समिती परिसरात खळबळ
केज | प्रतिनिधी
चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याच्या प्रकरणात अनुकूल भूमिका घेण्याच्या मोबदल्यात 20 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून केज येथील कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आणि जिल्हा परिषद शिक्षकाला जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने बुधवारी (दि. 14 ऑक्टोबर) दुपारी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे केज तालुक्यातील शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.दत्तात्रय मुरलीधर चाटे (वय 56, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती केज) आणि जयगुरु शिवाजी गिरी (जिल्हा परिषद शिक्षक, तांदळे वस्ती) अशी कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तींची नाबे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या चौकशी अहवालासंदर्भात शिक्षण विभागात कारवाई सुरू होती. हा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर न करण्याच्या मोबदल्यात संबधितांकडून 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोपा आहे. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने जालना एसीबीकडे तक्रार दाखल केली.तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास केज येथील गट साधन केंद्रात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे 20 हजार रुपयांची रक्कम स्वीकारली जात असताना पथकाने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले.या घटनेनंतर पंचायत समिती परिसरात चर्चेला उधाण आले असून, शासकीय कामकाजातील कथित लाचखोरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळाली.
