केज ! प्रतिनिधी
केज तालुक्यातील सातेफळवाडी, घाडगेवस्ती तसेच ढोराळे वस्ती येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सातेफळवाडीसाठी जलजीवन मिशनअंतर्गत सन २०२२ मध्ये सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीतून पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर करण्यात आले. काम सुरू होऊन चार वर्षे झाले पण अद्याप काम पूर्ण झाले नाही
काम तात्काळ पूर्ण करण्यात यावी यासाठी हनुमंत घाडगे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
याबाबत सातेफळ येथील हनुमंत बळीराम घाडगे यांनी पंचायत समिती, केजच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी दिवाळीनंतर पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी व बोअर अधिग्रहित केले जातात. मात्र एप्रिल-मे महिन्यात अधिग्रहित विहिरींमध्येही पुरेसे पाणी राहत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे पावसाचे प्रमाण कमी असल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सातेफळ गाव व घाडगेवस्ती, दोराळे वस्ती यांच्यासाठी जलजीवन योजना मंजूर असूनही ती अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे संबंधित कामाच्या ठेकेदारांना आदेश देऊन दोन महिन्यांत प्रत्यक्ष गावाला जलजीवन योजनेचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
काम तातडीने सुरू न झाल्यास आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा हनुमंत घाडगे यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती तहसील कार्यालय केज, उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई, जिल्हाधिकारी बीड तसेच ग्रामविकास मंत्री कार्यालयाकडे देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासन आता या रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत तात्काळ कार्यवाही करून काम पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
