३१ मार्च पर्यंत पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी

ई-केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांचा धान्यांचा लाभ होणार बंद-श्रीम.सुजाता रामटेके

केज ! प्रतिनिधी

केज तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी अन्यथा ई-केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांचा धान्यांचा लाभ बंद होणार आहे अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे केज तहसीलच्या पुरवठा विभागाच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीम.सुजाता रामटेके यांनी दिली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, शासनाच्या निर्देशा नुसार केज तहसीलचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाच्या वतीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभधारकांना ई-केवायसी करण्यासाठी कॅम्प आयोजित केले होते.ई-केवायसी कॅम्प मध्ये अनेक लाभार्थ्यांनी केवायसी करून घेतली आहे या कॅम्पला लाभधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना शासकीय अनुदानित धान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी कुटुंबातील रेशन कार्ड मध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.
ज्या सदस्यांची ई-केवायसी दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी पर्यंत मुदतीत पूर्ण होणार नाही, आशा सदस्यांचा अन्नधान्याचा लाभ बंद होणार आहे.
तरी शासन निर्देशानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या गावातील रास्त भाव दुकानदाराशी तात्काळ संपर्क करून रास्तभाव दुकानात समक्ष उपस्थित राहून ई-पाॅस मशीनवर बायोमेट्रिक थंम देऊन ई-केवायसी करून घ्यावी किंवा शासनाने उपलब्ध करून दिलेल्या “मेरा-केवायसी”ॲप द्वारे स्वतःच्या मोबाईल वरून दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. ई-केवायसी पूर्ण न केल्यास अन्नधान्याचा लाभ बंद करण्याबाबत शासनाचे निर्देश प्राप्त झाले आहेत.
जर ई-केवायसी न केल्यास अन्नधान्याचा लाभ बंद झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची असेल याची नोंद घेण्यात यावी असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
लाभार्थ्यांनी ई-केवायसी करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात जाता वेळी सोबत कुटुंबातील सर्व सदस्यांचे मूळ आधार कार्ड झेरॉक्स प्रति व रेशन कार्ड घेऊन जाणे बंधनकारक आहे.
तरी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ आपल्या गावातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या आदेशावरून पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती सुजाता रामटेके यांनी केले आहे.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *