केज! प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस नसल्याने पिके हाताची गेली असून जनावरांच्या चारा – पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. तर जनावरांसाठी तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासून पावसाने ओढ घेतल्याने अत्याअल्प पावसावर पेरण्या केल्या होत्या. पेरण्यानंतर पिकांच्या वाढीसाठी समाधानकारक पावसाची गरज होती. मात्र सतत पावसाचा खंड पडल्याने अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणी देऊन पिके वाढविण्याचा प्रयत्न केला. परंतु गरजेच्या वेळी पाऊस न पडल्याने सोयाबीन पिके पिवळी पडून वाळली आहेत. तर सोयाबीन पिकांसह इतर पिके हातून गेली आहेत. खरीप हंगामाच्या पिकांचे उत्पन्न पदरात पडणार नसल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. पेरणीसाठी केलेला खर्च व पुढे औषध फवारणीवर केलेला खर्च ही निघणार नसल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. तर शेतकऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर समाधानकारक पाऊस न पडल्याने मांजरा धरणासह लघु प्रकल्प व तलावात पाणी साठा झालेला नाही. विहिरी आणि बोअरची पाणी पातळी खोलवर गेल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांसाठी चारा – पाणी उपलब्ध नसल्याने पशुधन जगावयाचे कसे ? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.
पावसाच्या खंडामुळे पिके पूर्णतः हातातून गेल्याने शासनाने आता पंचनामे करण्याच्या भानगडीत न पडता सरसगट कोरडा दुष्काळ जाहीर करून दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना राबवाव्यात. तर अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा भरला नसल्याने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी. शेतकरी वर्गास आधार द्यावा, पिकविमा ही लागू करावा, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी केली आहे.

पालकमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार

आमच्या नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार आहे. कोरड्या दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाकडून भरीव मदत मिळण्यासह जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

रमेशराव आडसकर
जेष्ठ नेते, रा. काँ. पार्टी.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *