केज ! प्रतिनिधी
केज तालुक्यातील होळ येथील जलजीवन मिशन अंतर्गत रखडलेली योजना तत्काळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, यासह विविध मागण्यासाठी पत्रकार उत्तरेश्वर शिंदे यांनी बुधवारपासून (दि.१५) होळ येथील पाण्याच्या फिल्टरसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. पाईपलाईन करण्यासाठी गावात खोदण्यात आलेले रस्ते दुरुस्त करून देणे, नागरिकांना तत्काळ नळ कनेक्शनची जोडणी करणे आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील अपूर्ण राहिलेले पाईपलाईनचे काम तातडीने पूर्ण करणे, या प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरु केले आहे. यानिमित्ताने गावातील पिण्याच्या
पाण्याच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. उपोषणस्थळी भाजप युवा मोर्चाचे केज तालुका उपाध्यक्ष धनराज लाटे यांनी जाऊन मागण्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. प्रशासनाकडून सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात आणि पत्रकार उत्तरेश्वर शिंदे यांचे उपोषण सुटून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी त्यांनी संबंधित
प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा सुरू केली आहे. याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे पो.हे. कॉ. सय्यद अमजद, पो.कॉ. सुरेश गित्ते यांनी उपोषणस्थळी भेट दिली. दरम्यान, जोपर्यंत मागण्यांची लेखी पूर्तता होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला आहे
