पोलिसांचा पक्षपातीपणा; खा.सोनवणेंकडून ‘त्या’ हल्लेखोरांच्या अटकेची मागणी
पोलीस अधिक्षकांना केले अवाहन
बीड ! प्रतिनिधी
परळीत बोगस मतदान रोखण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ॲड.माधव जाधव यांच्यावर २० नोव्हेंबर रोजी परळी येथे जीवघेणा हल्ला करण्यात आला. पोलीसांसमोर हल्ला होऊनही गुन्हा दाखल केला नसून पोलिसांकडून पक्षपातीपणा सुरू आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करून हल्लेखोरोंना अटक करावी, असे अवाहन खा.बजरंग सोनवणे यांनी पोलिस अधिक्षकांना केले आहे.
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, परळीत बोगस मतदान रोखण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ॲड.माधव जाधव यांच्यावर २० नोव्हेंबर रोजी परळी येथे जीवघेणा हल्ला करण्यात आला. याच परिसरात उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या सुरक्षा रक्षकांनाही हल्लेखोरांकडून दमदाटी करण्यात आली. हा प्रकार पोलीस यंत्रणेसमोर घडूनही अद्यापपर्यंत हल्लेखोरांवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. उलट, आकसापोटी उमेदवारांच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. हा पक्षपातीपणा खपवून घेतला जाणार नाही. बीड पोलीस अधीक्षक यांना माझे आवाहन आहे, ॲड.माधव जाधव यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी. अन्यथा, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, व त्याच्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी पोलीस अधीक्षकांवर असेल, असेही खा.बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे. शिवाय परळीत मतदान सुरू असताना अनेक ठिकाणी मतदारांनाही दमदाटी करण्याचे प्रकार घडले असून पोलीसांच्या अंगावरही विरोधकांचे कार्यकर्ते धावून गेलेले आहेत. असे असताना पोलीसही शांत आहेत. येणाऱ्या काळात हे असेच वाढत जाऊन लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी बघ्याची भुमीका न घेता दोषींवर निपक्षपातीपणे कारवाई करावी, असेही म्हटले आहे.
