अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा; कृषिमंत्री आणि सहकारमंत्र्यांकडेही केली पाठपुराव्याची विनंती
केज| प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यास होत असलेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत अंबा साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी २८ ऑक्टोबर रोजी आयडीबीआय बँकेच्या बनसारोळा शाखेला भेट देऊन बँक प्रशासनाशी चर्चा केली. या चर्चेनंतर पात्र शेतकऱ्यांची यादी २ नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आश्वासन बँक प्रशासनाने दिल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी बँक स्तरावर लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध होणे महत्त्वाचे आहे. मात्र, बनसारोळा शाखेच्या कार्यक्षेत्रातील पात्र शेतकऱ्यांची यादी अद्याप प्रसिद्ध न झाल्याने शेतकऱ्यांना बँकेच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. कर्जमाफीचा लाभ नेमका कोणाला मिळणार, याबाबतही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर रमेशराव आडसकर यांनी बँक प्रशासनाची भेट घेत यादी प्रसिद्ध करण्यास होत असलेल्या विलंबाबाबत जाब विचारत हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी झालेली चर्चा सकारात्मक झाली असून, २ नोव्हेंबरपर्यंत यादी प्रसिद्ध केली जाईल, असा शब्द बँक प्रशासनाने दिल्याचे सांगण्यात आले.
*कृषिमंत्री, सहकारमंत्र्यांकडेही पाठपुरावा*
केवळ बँक प्रशासनाशी चर्चा करून न थांबता आडसकर यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशीही दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. आयडीबीआय बँक प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देऊन पात्र शेतकऱ्यांच्या याद्या लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी दोन्ही मंत्र्यांकडे केली.
*शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा*
कर्जमाफीच्या यादीला होणारा विलंब हा केवळ प्रशासकीय प्रश्न नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनाशी निगडित विषय आहे. कर्जमाफीचा लाभ स्पष्ट न झाल्याने पुढील हंगामासाठी पीककर्ज मिळवताना तसेच इतर शेतीविषयक आर्थिक नियोजन करताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची यादी तातडीने प्रसिद्ध करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
या वेळी बनसारोळा, आवसगाव, बोरीसावरगाव, कौडगाव, औरंगपूर आणि इस्थळ या गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता बँक प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार २ नोव्हेंबरपर्यंत यादी प्रसिद्ध होते का, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
