माजलगाव! प्रतिनिधी
धोंडे माजलगाव (जि. बीड) जेवणासाठी आलेल्या जावयाला पाच ग्रॅम सोन्याची अंगठी भेट देण्याचा सासरच्यांचा बेत एका मांजरीमुळे फसला. अंगठी लपवून ठेवलेला धोंडा घरात आलेल्या मांजरीने गिळल्याने जावयाची सोन्याऐवजी कपड्यांच्या आहेरावरच बोळवण करावी लागली.
माजलगावजवळील एका वस्तीवर ४ जून रोजी हा प्रकार घडला. सासूबाईनी जावयाला सरप्राइज देण्यासाठी अंगठी धोंड्यात ठेवून तो इतर धोंड्यांसोबत ठेवला होता. मात्र स्वयंपाकानंतर आवराआवरी सुरू असताना घरात आलेल्या मांजरीने नेमका तोच धोंडा फस्त केला. त्यामुळे घरच्यांची धांदल उडाली.
अंगठी परत मिळावी म्हणून मांजरीला चार दिवस घरात बांधून ठेवण्यात आले. विष्ठेद्वारे अंगठी बाहेर पडेल, अशी अपेक्षा होती. तसे न झाल्याने तिला पशुवैद्यकाकडे नेण्यात आले. उलटी होण्यासाठी औषधही देण्यात आले; परंतु मांजरीला उलटी झाली नाही उलट त्यात बिचारीचा जीव गेला. त्यानंतर मृत मांजरीच्या पोटावर शस्त्रक्रिया करून सोन्याची अंगठी बाहेर काढण्यात आली.
