स्वामी विवेकानंद माध्यमिक विभाग शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा संपन्न
स्पर्धेतील सहभागामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास घडून येतो- हनुमंत घाडगे
केज ! प्रतिनिधी
जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ( मा. वि. ) या शाळेमध्ये दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील शालेय अंतर्गत तसेच विविध स्पर्धेमधील घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा अत्यंत हर्षोत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जीवन विकास शिक्षण मंडळाचे सचिव गिन्यानदेव गदळे, प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक हनुमंतराव घाडगे, इतर उपस्थितीमध्ये पोस्टमन म्हणून कार्यरत असणारे अंकुश चाटे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या शालेय अंतर्गत वैयक्तिक तसेच सांघिक स्पर्धेतील विजयी खेळाडूंचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. पुढे एकलव्य सामान्य ज्ञान स्पर्धा, दहावी स्वयंशासन दिनानिमित्त उत्कृष्ट अध्यापन करणारे विद्यार्थी, चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी, योगासन तसेच लेझीम पथकातील विद्यार्थी, तुळजापूर येथील मराठवाडास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेते विद्यार्थी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेतील क्रीडाशिक्षक श्रीकिशन नेहरकर, कलाशिक्षक दादासाहेब गायकवाड, वक्तृत्व स्पर्धेसाठी दत्ता सत्वधर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच इतर स्पर्धात्मक परीक्षेसाठी शाळेतील सर्व शिक्षक विशेष परिश्रम घेतात.
याप्रसंगी बोलताना हनुमंत घाडगे म्हणाले, विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये सहभागी झाले पाहिजे, कारण बक्षीसांपेक्षा स्पर्धेतील सहभाग महत्त्वाचा असतो. शालेय अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होतो, परंतु स्पर्धेतील सहभागामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होतो. करिता पालकांनी देखील आपल्या मुलांना विविध स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तसेच आभार प्रबोधकांत समुद्रे यांनी मानले.
