सध्या ढगाळ वातावरणामुळे गहु, ज्वारी हरभरा पीके धोक्यात

केज । प्रतिनिधी

सध्या आकाशात ढगांची गर्दी, त्यात थंडी. या वातावरणामुळे गहु, ज्वारी, हरभरा पिकावर आळ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे रब्बीची इतर पिकेही धोक्यात आली आहेत, तसेच तुरीवरही अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने शेतकऱ्यांच्या संकटात वाढ होत आहे.

रब्बीची पेरणी झाल्यानंतर पीके जोमात होते परंतु अचानक हवामान बदलामुळे काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी येत असल्याने व आभाळ असल्याने. रब्बीची पीके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जुन महिन्यात चांगला पाऊस झाला त्यामुळे विहीर,बोरला चांगले पाणी असल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला होता. पंरतू गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरण राहिले त्यामुळे हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात हिरवी व काळी अशा दोन प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे. या आळ्या हरभऱ्याचे शेंडे कुरतडत आहेत. कोवळी पाने खात आहेत. त्यामुळे हरभऱ्याचे पीक सध्या धोक्यात आले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे तसेच ज्वारीवरही मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ज्वारीचे पीकही वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इतरपिकांवरही मोठ्या प्रमाणात विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अशा स्थितीत रब्बी पीकांचे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच कांही ठिकाणी मावा पडल्याने पीके धोक्यात आली आहेत. त्यातच निसर्गही शेतकऱ्यांवर कोपलेला दिसून येत आहे. नुकसान तर शेतकऱ्यांची पाठ सोडतच नाही, त्यामुळे सध्या पिकांवर पडणाऱ्या अळ्यांमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण पसरले आहे.

मागील 3-4 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने हरभरा पिकामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
अळीच्या नियंत्रणासाठी खालील उपाय योजना कराव्यात.
१. हेक्टरी 50-60 पक्षी थांबे उभारावेत.
2. प्रती एकरी 05 कामगंध सापळे लावावेत.
3. निंबोळी अर्क 10000PPM 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे.
4.घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी पार केल्यास 1-2 अळी प्रती मीटर ओळ रासायनिक कीटकनाशक फवारणी करावी.
इमामेक्टिन बेंजोएट 04 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी किंवा फ्ल्युबेंडामाईड 03 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी मध्ये फवारणी करावी.

सागर पठाडे
तालुका कृषी अधिकारी केज

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *